जळगाव – भारतरत्न तथा भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भीमाबाई रामजी सकपाळ ( आंबेडकर ) यांचा जन्म १४ फेब्रुवारी १८५४ ला ठाणे जिल्ह्यातील आंबेटेंभे तालुका मुरबाड येथे झाला . त्यांचे वडील धर्मा पंडित हे सैन्यामध्ये मेजर म्हणून नोकरीला होते . त्यांच्या कुटुंबातील बहुतेक पुरुष हे सैन्यात नोकरीला असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती खूप चांगली होती . काही कारणाने ते मुरबाड येथे राहायला आले व त्यांनी आपले पंडित आडनाव बदलवून मुरबाडकर केले .

मुरबाड मधील सर्वात श्रीमंत म्हणून त्यांची त्याकाळी ओळख होती . त्यांना दोन मुली व एक मुलगा होता . ते भीमाबाई यांचा सर्वात जास्त लाड करत होते . असे सांगितले जाते की त्यांच्या अती लाडामुळे भीमाबाई खूप तापट , हट्टी , जिद्दी झाल्या होत्या.भीमाबाई लहानपणापासून तापट तसेच वाचाळ असल्याने घरातील मंडळी बऱ्याचदा हैराण होऊन जायचे त्यामुळे प्रसंगी ते भिमाबाईंना मारत असत, मार खाण्यात व मारण्यात त्या नेहमी पुढं असत . १८६६ मध्ये रामजी सपकाळ हे सैन्यात शिपाई म्हणून नोकरीस लागले.धर्मा पंडित व रामजी सपकाळ एकाच ठिकाणी नोकरीस असल्याने दोघांची गाठभेट होत असे , या भेटीतून धर्मा पंडित यांनी त्यांची मुलगी भिमाबईचा विवाह रामजी सोबत लावण्याचा विचार घरातील अन्य मंडळींना बोलून दाखविला मात्र घरातील मंडळींनी रामजी एक शिपाई आहे तेंव्हा आपल्या कुटुंबाला ते शोभणारे नाही असे सांगून विरोध केला.
असे असले तरी धर्मा पंडित आपल्या विचारावर ठाम होते . त्यांनी त्यांचा विचार रामजी यांचे वडील मालोजी यांचेकडं बोलून दाखविला. मालोजी मुलगी ( भीमाबाई ) बघायला गेले , त्यांनी मुलगी पसंत असल्याचे सांगितले असे असले तरी भीमाबाई यांचे अन्य नातेवाईक खासकरून महिला नाराज होते . घरात चर्चा करीत असता धर्मा पंडित यांनी रामजी यांचे वर्तन , स्वभाव , देखणेपण सांगितले व मुलगा माझ्याच देखरेखी खाली असल्याने मुलगी सुखात राहील असे सांगितले . त्यांच्या भावांनी लग्नास संमती दिली.

१८६७ मध्ये रामजी व भीमाबाई यांचा विवाह मुरबाड येथे अत्यंत थाटात संपन्न झाला . हा विवाह एखादा शाही विवाह वाटावा या स्वरूपाचा होता . अस्पृश्य समाजात तसेच अन्य लोकांमध्ये या विवाहाची बरीच चर्चा झाली . भीमाबाई यांना त्यांच्या वडिलांनी लग्नानिमित्त बरीच दागिने दिले होते . पुढं रामजी यांनी सुद्धा त्यांना बरीच दागिने करून दिली . रामजी यांची आर्थिक परिस्थिती तशी चांगली होती . असे असले तरी भीमाबाई जेंव्हा कधी माहेरी जात तेंव्हा त्यांचे आई , वडील सोडले तर अन्य कोणी त्यांचेशी चांगले बोलत नसत. आमच्यापेक्षा तुझी आर्थिक परिस्थिती गरिबीची आहे म्हणून सारखे टोमणे मारत होते . अश्याच एका भेटीत त्यांना असे टोमणे असह्य झाले व त्यांनी त्यांच्या सर्व नातेवाइकांना ठणकावून सांगितले की जो पर्यंत मी तुमच्यापेक्षा अधिक दागिने मिळवत नाही तो पर्यंत तुमच्या घरी येणार नाही . असे सांगून त्या तडक घरी निघून आल्या .

नातेवाइकांचे शब्द जिव्हारी लागल्याने व त्यांच्यापेक्षा अधिक दागिने घेण्याच्या जिद्दीने त्या विचार करू लागल्या व स्वतः मिळेल ते काम करू लागल्या . सांताक्रुज येथे असताना त्या खडी फोडायला लागल्या . रस्त्याच्या कामावर खडी पसरविणे , डांबर टाकणे सारखी कामं करू लागल्या . मिळणाऱ्या मजुरीतून दागिने विकत घेणे सुरू केले व बरीच दागिने विकत घेतले .असे असले तरी माहेरची मंडळी आपल्याला कमी लेखतात म्हणून त्या माहेरी जात नव्हत्या मात्र माहेरचे कोणी आले तर त्यांची सरबराई त्या करत असत. माहेरच्या लोकांनी व रामजी यांनी त्यांची समजूत काढली व माहेरी जाण्याविषई सांगू लागले तेंव्हा कुठे तब्बल १४ वर्षानी त्या माहेरी गेल्या . भीमाबाई यांचा स्वभाव पुढं पुढं खूप बदलत गेला . त्यांच्यातील तापटपणा बराच कमी झाला.

माहेरच्या लोकांनी त्यांना अपमानित केले असले तरी त्या त्यांच्या समवेत चांगल्या राहू लागल्या . सर्वांशी प्रेमाने व सहकार्याने त्या राहू लागल्या . पतींच्या सांगण्या प्रमाणे त्या घरात धार्मिक विधी करत असत. कबिरपंथ स्वीकारल्या नंतर पती सोबत कबिराचे दोहे त्यासुद्धा म्हणू लागल्या . घरात नियमित पूजापाठ करून उपास धरू लागल्या . त्यांनी त्यांच्या मुलांवर धार्मिक संस्कार केले . आज त्यांच्या माहेरी म्हणजेच आंबेटेंभे येथे सुमारे अडीच कोटी रुपयाचे समाज मंदिर समाजकल्याण विभागातर्फे उभारण्यात आले आहे . या करिताची जागा त्याच गावातील दानशूर दाजी लक्ष्मण खरे यांनी दान दिली आहे . धर्मा पंडित ( मुरबाडकर ) यांच्या परिवारातील काही मंडळी ( पाचवी पिढी ) आजही या गावी राहत आहेत . १८ व्या शतकातील त्यांचे राहते घर आजही तशेच उभे आहे . भीमाबाई यांच्या माहेरी त्यांच्या संदर्भाने खरेतर एखादे स्मारक होणे , त्यांचा पुतळा उभारणे , त्यांचे राहते घर स्मारक रुपात जतन करणे गरजेचे आहे . तसे या गावी बौद्ध वस्तीखेरीज भीमाबाई यांच्या अनुषंगाने इतरत्र काही दिसत नाही . या संदर्भाने गावातील जनतेने वा त्यांच्या परिवाराने काही ठोस कार्य करणे गरजेचे आहे.

आज भिमाईंचा जन्मदिन त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.जयसिंग वाघ अजिंठा हाउसिंग सोसायटी , अजिंठा चौक जळगाव संपर्क ९८८१९२८८८१





