✍️करण भरणे सर (ढाणकी बिटरगाव प्रतिनिधी)

ढाणकी – आयडियल एज्युकेशन सोसायटी संचलित हनीफ मास्टर उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, ढानकी या शासन मान्यता प्राप्त व अनुदानित शाळेचे संस्थाचालक यांच्याविरुद्ध शाळेच्या इमारतीचा गैरवापर व पालकांशी गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप करत पालकांनी गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती उमरखेड यांना लेखी निवेदन दिले आहे.

दिनांक 01 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या पालक सभेत पालकांनी शाळेच्या फी वाढ, विकास निधीचा हिशोब व इमारतीच्या वापराविषयी संविधानिक प्रश्न उपस्थित केले होते. यावेळी संस्थाचालकांनी “जा गेटच्या बाहेर जाऊन काय विचारायचे ते विचारा. इथे तुमचा माहिती अधिकार काही चालणार नाही” अशा शब्दात अरेरावी व धमकावण्याची भाषा वापरल्याचा आरोप पालकांनी केला आहे.*शासकीय मालमत्तेचा गैरवापराचा आरोप*पालकांच्या म्हणण्यानुसार, संस्थाचालकांनी शाळेला लागूनच “हसन अली पब्लिक स्कूल” या नावाने नवीन खाजगी इंग्लिश माध्यम संस्था सुरू केली आहे.

या नवीन संस्थेसाठी फक्त 2 वर्ग खोल्या बांधल्या आहेत. उर्वरित 2 खोल्यांसाठी शासन अनुदानाने बांधलेल्या हनीफ मास्टर उर्दू हायस्कूलच्या इमारतीतील खोल्या बेकायदेशीरपणे वापरल्या जात आहेत. हा महाराष्ट्र खाजगी शाळा अधिनियम 1977 व मान्यता नियम 2001 चा भंग असल्याचे निवेदनात म्हटले आहे.*चौकशीची मागणी*पालकांनी निवेदनात 4 प्रमुख मागण्या केल्या आहेत. 1. शाळेच्या इमारतीचा दुसऱ्या संस्थेसाठी होणारा वापर त्वरित बंद करावा. 2. शाळेच्या आर्थिक व्यवहारांची लेखापरीक्षणाद्वारे चौकशी करावी. 3. पालकांशी असभ्य वर्तन करणाऱ्या संस्थाचालकांवर शिस्तभंगाची कारवाई करावी. 4. दोषी आढळल्यास संस्थेची मान्यता रद्द करावी.यासोबत पालक सभेचे फोटो व दोन्ही संस्थांच्या इमारतींचे फोटो पुरावा म्हणून जोडण्यात आले आहेत.

या प्रकरणी 15 दिवसांत चौकशी न झाल्यास संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही पालकांनी दिला आहे.तसेच या निवेदनाच्या प्रती शिक्षणमंत्री, शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी यवतमाळ व उपविभागीय अधिकारी उमरखेड यांना देखील पाठवण्यात आल्या आहेत.

यावेळी शेख सफदर, मुजाहिद खान, मोबिन खान, सैय्यद इरफान, शेख एजाज, अजीज खान यांसह नागरिक पालक उपस्थित होते.







