✍️सिद्धार्थ दिवेकर रिपोर्टर कार्यकारी संपादक मो.9823995466

उमरखेड : कृषी महाविद्यालय, उमरखेड अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमाअंतर्गत कृषीदूतांनी शेतकऱ्यांसाठी “वृक्षलागवडीसाठी खड्डे खोदणे व वैज्ञानिक पद्धतीने भरणे” या विषयावर प्रात्यक्षिक आयोजित केले.

या उपक्रमाचा उद्देश शेतकऱ्यांना वृक्षलागवडीपूर्वी खड्डे तयार करण्याची शास्त्रोक्त पद्धत, मातीचे व्यवस्थापन आणि निरोगी रोपांच्या वाढीसाठी आवश्यक तंत्रज्ञानाची माहिती देणे हा होता.यावेळी १ मीटर × १ मीटर × १ मीटर आकाराचा खड्डा खोदून त्यात टप्प्याटप्प्याने भरणी कशी करावी, हे प्रत्यक्ष दाखवण्यात आले. सुरुवातीला खड्ड्याच्या तळाशी ट्रायकोडर्माचा वापर करण्यात आला. त्यानंतर वरची सुपीक माती व चांगले कुजलेले शेणखत यांचे मिश्रण दोन ते तीन थरांमध्ये भरून प्रत्येक थर व्यवस्थित दाबून समतल करण्यात आला. शेवटी शिफारशीनुसार बुरशीनाशकाची मात्रा टाकून खड्डा पूर्ण भरून तो वृक्षलागवडीसाठी तयार करण्यात आला.

अंतिम भरणीनंतर १५ ते २० दिवसांनी रोपांची लागवड करावी, जेणेकरून माती व्यवस्थित बसून खतांचे विघटन होऊन रोपांना आवश्यक पोषकद्रव्ये उपलब्ध होतात, असे मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी ट्रायकोडर्माच्या वापरामुळे जमिनीतील रोगकारक बुरशींचे नियंत्रण होण्यास मदत होते, तर शेणखतामुळे सेंद्रिय कर्ब वाढून मातीची सुपीकता आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारते, असे सांगण्यात आले. तसेच थरांमध्ये खड्डा भरल्यामुळे मुळांची वाढ जोमदार होते, अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर होतो, रोपांची वाढ चांगली होते आणि भविष्यात वृक्षांची वाढ व टिकाऊपणा सुधारण्यास मदत होते, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रात्यक्षिकाद्वारे योग्य पद्धतीने खड्डे तयार केल्यास वृक्षांची वाढ अधिक निरोगी होते, जगण्याचे प्रमाण वाढते, मुळांचा विकास चांगला होतो तसेच पर्यावरण संवर्धनास चालना मिळते, असे कृषीदूतांनी स्पष्ट केले. उपस्थित शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निवारण करण्यात आले.

या उपक्रमास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. कृषीदूत प्रथमेश कळसकर, समीर रोडे, प्रसाद गिरडकर, आदित्य गावंडे व श्रेयश मिलमिले यांनी प्रात्यक्षिकाचे प्रभावी सादरीकरण करून शेतकऱ्यांना शास्त्रोक्त वृक्षलागवडीबाबत मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालय, उमरखेडचे प्राचार्य सचिन चिंतले यांचे मार्गदर्शन लाभले.

तसेच ग्रामीण जागरूकता कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमाधिकारी प्रा. अनिल इंगळे व प्रा. पल्लवी घोटेकर, मार्गदर्शक प्रा. विजय शिंदे तसेच विषयतज्ज्ञ प्रा. डॉ. माधवी भालधरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.






