
[‘उत्कृष्ट कार्य गौरव पुरस्कार–२०२६’ ने सन्मान; स्वातंत्र्यदिनी मिळाला मानाचा बहुमान..!]

✍️सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466
उमरखेड – स्वातंत्र्यदिनाच्या पावन पर्वावर जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे जिव्हाळा संस्थेच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘उत्कृष्ट कार्य गौरव पुरस्कार–2026’ प्रदान करून संस्थेला सन्मानित करण्यात आले. हा मानाचा पुरस्कार मृद व जलसंधारण मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. संजय दुलीचंद राठोड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा मानाचा बहुमान जिव्हाळा संस्थे तर्फे जिव्हाळा संस्थेचे अध्यक्ष अतुल लताताई राम मादावार यांनी हा पुरस्कार स्वीकारला आहे. यावेळी यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, निवासी जिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, आमदार दुष्यंत चतुर्वेदी, यवतमाळ नगराध्यक्षा श्रीमती प्रियदर्शनी उईके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी व मान्यवर उपस्थित होते.मागील 15 वर्षांपासून जिव्हाळा संस्था महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये ग्रामीण व वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे.

महिला व बाल सक्षमीकरण, युवक विकास, शिक्षण, आरोग्य व पोषण, कौशल्य विकास, रोजगार व उपजीविका, आर्थिक साक्षरता, जलसंधारण, कृषी व पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन तसेच कोरोना महामारीच्या काळातील उल्लेखनीय कार्य अशा विविध क्षेत्रांत संस्थेने सातत्यपूर्ण योगदान दिले आहे.विशेषतः मागील वर्षी उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात जिल्हा प्रशासन व स्थानिक प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली जीवाची पर्वा न करता जिव्हाळा संस्थे ने पूरग्रस्त हजारो कुटुंबांना मदत, जीवनावश्यक साहित्याचे वितरण, आरोग्य व स्वच्छतेसाठी विविध उपक्रम तसेच पुनर्वसनाच्या माध्यमातून संस्थेने सामाजिक बांधिलकी जपली. आपत्तीच्या काळात प्रशासनासोबत समन्वय साधत गरजू कुटुंबांपर्यंत मदत पोहोचविण्यात संस्थेने महत्त्वाची भूमिका बजावली.यासोबतच यवतमाळ जिल्ह्यातील इयत्ता 09 वी ते 12 वी तील 225 मुलींना CSR निधीच्या माध्यमातून शैक्षणिक शिष्यवृत्ती उपलब्ध करून देत त्यांच्या शिक्षणाला आर्थिक आधार देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य जिव्हाळा संस्थेने केले आहे. विशेषतः ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या वंचित कुटुंबातील मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी संस्थेचा हा उपक्रम मोलाचा ठरला आहे.

महाराष्ट्र शासनाने संस्थेच्या या सातत्यपूर्ण, समाजाभिमुख आणि परिणामकारक कार्याची दखल घेत ‘उत्कृष्ट कार्य गौरव पुरस्कार–२०२६’ प्रदान केल्याने हा सन्मान जिव्हाळा संस्थेच्या सामाजिक कार्याला मिळालेली महत्त्वपूर्ण शासनमान्यता मानली जात आहे.“हा पुरस्कार केवळ जिव्हाळा संस्थेचा नसून, संस्थेसोबत निःस्वार्थपणे कार्य करणारे कार्यकर्ते, स्वयंसेवक, लाभार्थी, सहकारी संस्था आणि समाजातील प्रत्येक सहृदय व्यक्तीच्या योगदानाचा गौरव आहे.

या सन्मानामुळे समाजातील गरजू घटकांसाठी अधिक व्यापक आणि परिणामकारक पद्धतीने कार्य करण्याची आमची जबाबदारी वाढली असून, भविष्यातही समाजसेवेचा हा प्रवास अधिक जोमाने सुरू ठेवण्याची प्रेरणा मिळाली आहे,” अशी भावना जिव्हाळा संस्थेचे अध्यक्ष श्री. अतुल लताताई राम मादावार यांनी व्यक्त केली.स्वातंत्र्यदिनाच्या राष्ट्रीय पर्वावर महाराष्ट्र शासनाकडून मिळालेला हा बहुमान जिव्हाळा संस्थेच्या सामाजिक कार्याच्या प्रवासातील अभिमानास्पद आणि ऐतिहासिक टप्पा ठरला आहे.


जिव्हाळा संस्थे च्या अविरत निस्वार्थ कार्यास पुरस्कार मिळाल्या बद्दल जन सामान्या मधून कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे या गौरव सोहळ्याप्रसंगी जिव्हाळा संस्थेचे धनराज राऊत, गजानन श्रीरामांजवार, रुद्राक्ष मादावार आणि रोहित अलमुलवार उपस्थित होते.







