✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

उमरखेड तालुक्यातील
तरोडा फाटा येथील पेट्रोल पंपासमोर असलेल्या एका चहा टपरीचालक करतो खुलेआम अवैधरित्या पेट्रोलची विक्री करत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. प्रत्यक्ष दर्शनी असे दिसून आले आहे. या प्रकारामुळे ग्रामीण भागातील वाहनचालकांची आर्थिक लूट होत असून, संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सध्या अधिकृत पेट्रोलचा दर सुमारे ₹113 प्रति लिटर असताना संबंधित टपरी चालक ₹150 प्रति लिटर तसेच अर्धा लिटर पेट्रोल ₹80 दराने विक्री करत असल्याचा आरोप आहे. पेट्रोलसारख्या अत्यंत ज्वलनशील पदार्थाची कोणत्याही अधिकृत परवान्याशिवाय सार्वजनिक ठिकाणी विक्री होत असल्यास ती गंभीर बाब असून, त्यामुळे आग लागण्याचा किंवा अन्य अपघात होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
विशेष म्हणजे, हा प्रकार पेट्रोल पंपासमोरच सुरू असल्याचा दावा नागरिकांनी केला असून, त्यामुळे टपरी चालक आणि संबंधित पेट्रोल पंप व्यवस्थापन यांच्यात काही मिलीभगत आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी होत आहे.
नागरिकांच्या मते, या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन जिल्हा पुरवठा विभाग, अन्न व नागरी पुरवठा प्रशासन, स्थानिक पोलीस प्रशासन, महसूल विभाग (तहसील कार्यालय) तसेच आवश्यक असल्यास अग्निशमन विभाग यांनी संयुक्त तपासणी करून अवैध पेट्रोल विक्री होत असल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी.

अवैध पेट्रोल विक्रीमुळे शासनाचा महसूल बुडण्याची शक्यता, ग्राहकांची आर्थिक फसवणूक आणि सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संबंधित विभागांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.







