
[जय वाल्मिकी दुर्गोत्सव मंडळ येथे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन.]
✍🏻 करण भरणे सर (बिटरगाव ढाणकी प्रतिनिधी)
ढाणकी – नवरात्र उत्सवाच्या सुरुवातीला घटस्थापनेच्या दिवशी ढाणकी शहरात अप्रिय घटना घडली. यामुळे समाजमन हळहळलं. पिडीतेला न्याय मिळावा यासाठी सर्वजण एकवटले. अशा घटना पुन्हा घडू नये,समाज चांगला व्हावा, परिवर्तन व्हावे, याकरिता सर्वजण आणा-भाका घेऊ लागले.
परिवर्तन व्हावं वाटत असेल तर सुरुवात स्वतःपासून करावी लागेल. हाच विचार मनी घेऊन ढाणकीतील जय वाल्मिकी दुर्गोत्सव मंडळाने ८ ते १२ वीच्या मुलींकरिता “घराची जबाबदारी लेक” या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. एवढ्या मोठ्या ढाणकी शहरात मोठमोठाल्या शाळा असून, केवळ स्वामी पेंडसे गुरुजी विद्यालयातील मुलींनीच या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला.

यात निकिता बाळू चव्हाण प्रथम, अपूर्वा अशोक चिरंगे द्वितीय तर वेदिका राजूसिंग राठोड हिने तृतीय क्रमांक पटकावला. तीनही स्पर्धकांनी घराची मर्यादा लेक या विषयावर आपल्या बुद्धी कौशल्यातून अप्रतिम प्रकाश टाकला.
या कार्यक्रमास बिटरगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार पांडुरंग शिंदे, बीट जमादार रवी गीते, काँग्रेस व्यापारी आघाडी तालुकाध्यक्ष रुपेश भंडारी, मारोतराव रावते हे प्रमुख स्थानी उपस्थित होते. वक्तृत्व स्पर्धेकरिता दिले जाणारे बक्षीस हे शहरातील यशस्वी व्यापारी, रुपेश किशोरचंदजी भंडारी यांच्या सौजन्यातून देण्यात आले.

सदर स्पर्धेचे परीक्षण विष्णू फुलेवार यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रभाग क्रमांक १२ मधील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
💥 ज्या विषयाला अनुसरून जय वाल्मिकी दुर्गोत्सव मंडळाने वक्तृत्व स्पर्धेचा कार्यक्रम घेतला , ही काळाची गरज असल्याने दुर्गा मंडळाचे सर्व स्तरातून कौतुक केल्या जात आहे. फक्त स्वामी पेंडसे शाळा सोडली तर एवढ्या मोठया शहरातील इतर शाळेतील मुलींनी स्पर्धेत सहभागी का होऊ नये ? हे तेथील शिक्षकांचे नक्कीच अपयश म्हणावे लागेल ? असाही प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे. परिवर्तनाची सुरुवात ही खडतर असते. गर्दी ही वाम मार्गाकडे जास्त असते, हे वास्तव आहे. परंतु जय वाल्मिकी दुर्गोत्सव मंडळाच्या या उपक्रमामुळे परिवर्तनास सुरुवात झाली हे मात्र तितकच खरं आहे.







