🚨(नवीन बिट जमादार आल्यापासून धंदे फोफावले; पत्रकारावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न)

✍🏻 राहुल पाईकराव (उमरखेड तालुका प्रतिनिधी)
उमरखेड :- बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आकोली गावांमध्ये दारुबंदीचा दावा केला जात असतानाच आकोली तांडा येथे अवैध देशी दारू व हातभट्टी खुलेआम सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या बेकायदेशीर धंद्यामुळे गावातील महिलांमध्ये तीव्र संताप उसळला असून, महिलांनी थेट ठाणेदार पांडुरंग शिंदे यांना निवेदन देत तात्काळ अवैध दारू बंद करण्याची ठाम मागणी करून खोटे तक्रार कर्त्यांवर कारवाईची मागणी केली.आकोली गावांमध्ये यापूर्वी ठाणेदार शिंदे यांनी दारुबंदीसाठी सभा घेऊन कारवाई केल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, आकोली तांडा हा परिसर जणू काही अवैध दारू विक्रेत्यांसाठी अभयारण्यच बनल्याचे चित्र आहे.
हातभट्टी, देशी दारूची सर्रास विक्री सुरू असून, याचा थेट फटका महिला व कुटुंबव्यवस्थेला बसत आहे. महिलांनी निवेदनात स्पष्ट इशारा दिला आहे की, “तात्काळ अवैध दारू बंद झाली नाही व खोटे गुन्हे नोंद करणारे अवैध दारूविक्रेते वर कारवाही झाली नाही, तर आम्ही थेट पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडू.”

🚨बिट जमादारावर गंभीर आरोप:- या प्रकरणात बिट जमादार अर्जुन राठोड यांच्या मनमानी कारभारावरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. महिलांनी आणि नागरिकांनी थेट मागणी केली आहे की,“तात्काळ बिट जमादारांची बदली करा, अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन अटळ आहे.”

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मागील बिट जमादारांच्या कार्यकाळात अवैध दारू जवळपास बंद होती. मात्र, नव्याने नियुक्त झालेल्या बिट जमादारांच्या काळात हे धंदे पुन्हा जोमाने फोफावले असून, परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
🚨पत्रकारावर खोट्या गुन्ह्याचा प्रयत्न? या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे. आकोली तांड्यातील एका अवैध दारू विक्रेती महिलेने अवैध दारूविक्रीविरोधात सातत्याने बातम्या प्रसिद्ध करणाऱ्या एका पत्रकारावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रयत्नाला नवीन बिट जमादारांची मूक संमती असल्याचे चित्र दिसून आले, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. यामुळे प्रश्न उपस्थित होत आहे की, अवैध धंदे उघड करणाऱ्यांनाच गप्प करण्याचा डाव तर रचला जात नाही ना?

चौकट- नागरिकांचा सवाल:- अवैध दारू, कथित पोलीस दुर्लक्ष आणि पत्रकारांवरील दबाव या सर्व प्रकारांमुळे नागरिक त्रस्त झाले असून, आता हा प्रश्न जिल्हा पातळीवर जाण्याची चिन्हे आहेत.निवेदन कर्ते महिलांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. “दारू विक्रेत्यांना संरक्षण देणाऱ्यांवर कारवाई झाली नाही, तर आम्ही मागे हटणार नाही. घराघरात उध्वस्तपणा माजवणारी ही दारू आता बंदच झाली पाहिजे.”आता या गंभीर आरोपांवर पोलीस प्रशासन काय भूमिका घेते, आणि आकोली तांड्यातील अवैध दारूवर खरोखरच कारवाई होते का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.




