✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)

पुसद:- आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक महानगरपालिकेच्या वतीने तपोवन परिसरात प्रस्तावित वृक्षतोड तात्काळ स्थगित करण्यात यावी, अशी ठाम मागणी स्व. मधुकरराव भगत शहरी व ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांना ई-मेलद्वारे पाठविण्यात आले, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष राजकुमार भगत यांनी दिली.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तपोवन परिसर हा नाशिक शहराचा फुफ्फुसासमान नैसर्गिक भाग असून येथील घनदाट वृक्षसंपदा पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

कार्बन डायऑक्साइड शोषून ऑक्सिजन निर्मिती, तापमान नियंत्रण, हवेतील प्रदूषण कमी करणे, भूजल पातळी टिकवणे आणि जैवविविधतेचे संरक्षण यामध्ये या परिसरातील वृक्षांचा मोठा वाटा आहे. कुंभमेळ्यासारख्या पवित्र धार्मिक आयोजनाच्या नावाखाली जर वृक्षतोड करण्यात आली, तर त्याचा पर्यावरणावर तसेच नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन, तज्ज्ञांचा सल्ला आणि पर्यायी पर्यावरणपूरक उपाययोजना राबवूनच कोणताही निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

स्व. मधुकरराव भगत शहरी व ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था मागील सात वर्षांपासून पर्यावरण संरक्षणासाठी कार्यरत असून दरवर्षी हजारो वृक्षांची लागवड व संवर्धन करते. “वृक्षबंध – समाजाशी जोडलेलं नातं” या उपक्रमातून पर्यावरण जनजागृतीचे कार्य सातत्याने सुरू असल्याचेही राजकुमार भगत यांनी सांगितले.







