🔥ग्रामस्थांचा तीव्र आक्षेप
✒️सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर कार्यकारी संपादक मो.9823995466

उमरखेड :- तालुक्यातील अकोली गावात ग्रामपंचायत निवडीअंती शासकीय राशन दुकानाचे वितरण बचत अंबिका महिला बचत गटाकडे सोपविण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात या गटाचा कारभार महिला सदस्यांऐवजी अध्यक्षा यांचे पतीराज व मुलगा करत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, बचत गटाच्या अध्यक्षा यांचे पतीराज अनेक महिलांशी अर्वाच्य व अपमानास्पद भाषेत शिवीगाळ करत असल्याचे प्रकार घडले आहेत. तसेच त्यांचा मुलगा देखील नागरिकांशी अरेरावीच्या भाषेत वागणूक देत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे गावातील महिला व राशनधारकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे.

महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने महिला बचत गटाला राशन दुकान देण्यात आले असताना, प्रत्यक्षात पुरुषांकडून कारभार चालवला जात असल्याने शासनाच्या धोरणालाच हरताळ फासला जात असल्याची टीका होत आहे. या प्रकारामुळे महिलांच्या स्वाभिमानाला धक्का बसत असून, गटाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.या पार्श्वभूमीवर अकोली येथील नागरिकांनी बचत गटाच्या अध्यक्षा व सचिवांनी स्वतः पुढाकार घेऊन राशन दुकानाचा संपूर्ण कारभार हातात घ्यावा, तसेच पतीराज व मुलाचा हस्तक्षेप तात्काळ थांबवावा, अशी ठाम मागणी केली आहे.

यासोबतच संबंधित विभागाने या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशीही अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. जर वेळेत दखल घेतली नाही, तर पुढील काळात आंदोलनाचा इशाराही नागरिकांकडून देण्यात आला आहे.






