✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर कार्यकारी संपादक मो.9823995466

उमरखेड :- (दिनांक 28 ऑगस्ट) अतिवृष्टी व ईसापुर धरणाच्या महापुराने शेतकऱ्यांच्या पिकांची धूळधाण झाली. शेतकऱ्यांच्या जमिनी गिळंकृत करणाऱ्या सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाचे संकट यासह, सिंचन प्रकल्पाची अपूर्णता, सरसकट कर्जमाफी अशा अनेक मागण्यांचे निवेदन काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस साहेबराव कांबळेंच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने, जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांना निवेदन दिले आहे.

सदर निवेदन मंत्रालय स्तरावर पोहोचले असून यावरून तात्काळ कार्यवाही झाल्यास शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.काँग्रेसच्या वतीने सहभागी शिष्टमंडळात प्रदेश सरचिटणीस साहेबराव कांबळे यांच्यासह शहराध्यक्ष नंदकिशोर अग्रवाल, तालुका अध्यक्ष दत्तराव शिंदे, प्रेमराव वानखेडे, दिलीप नरवाडे, गजानन भारती, श्रीराम वानखेडे, मधुकर फॅटिंग आदी उपस्थित होते. पालकमंत्री संजय राठोड यांची भेट घेत उमरखेड विधानसभेतील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यामध्ये पैनगंगा नदीवर प्रस्तावित सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प तात्काळ रद्द करावा.

1983 पासून पूर्ण ताकतीने सुरू झालेल्या उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचले नसल्याने, अपूर्ण काम पूर्ण करून, उर्वरित जमिनी सिंचना खाली आणाव्यात. 1980 मध्ये महागाव तालुक्यात सुरू झालेल्या लोअरपूस प्रकल्पाचे पाणी शेवटपर्यंत पोहोचले नसल्याने,अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करून उर्वरित जमिनी सिंचनाखाली आणाव्या.विद्युत प्रकल्प ऐवजी पैनगंगा नदीवर जागोजागी उच्च पातळीचे बंधारे बांधून शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध करून द्यावे.

शासनाच्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या पडीक जमिनीवर, सोलर प्रकल्प राबवून शेतकऱ्यांना 24 तास वीज देण्यात यावी. उमरखेड महागाव तालुक्यात 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान 157.5 ते 210 मीमी एवढ्या अतिवृष्टीने खरीप पिकांसह, केळी, हळद व ऊस इत्यादी पिकांची नुकसान भरपाई, सरसकट प्रति हेक्टर एक लाख रुपये तात्काळ देण्यात यावे. अतिवृष्टी व महापुराने पिकांचे झालेले नुकसान भरपाईसाठी सरसकट कर्जमाफी देण्यात यावी. मागील 2024-25 हंगामातील प्रलंबित पिक विमा व शासकीय मदत तात्काळ खात्यात जमा करावी.

दराटीतील शिवाजीनगर दोन या वस्ती जवळील नाल्यावर असलेला बंधारा पूर्ण क्षमतीने असल्याने त्या नाल्याची खोलीकरण व सरळीकरण नसल्याने रहिवाशांच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरून नुकसान होते, त्यामुळे या बंधार्याचे खोलीकरण, दुरुस्ती व सरळीकरण करण्यात यावे.

उमरखेड महागाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गावांना जोडणारी रस्ते व पुलांचे नुकसान झाले,ते तात्काळ दुरुस्त करण्यात यावे. उमरखेड महागाव तालुक्यात उसाचे पीक क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने अतिवृष्टीमुळे व महापुराणे शेतकऱ्यांचे भयंकर नुकसान झाल्याने , यापूर्वी 2006 व 2012 दिलेल्या अनुदानानुसार आजच्या परिस्थितीनुरूप खासबाब म्हणून अनुदान तात्काळ मंजूर करण्यात यावे.

उमरखेड महागाव विधानसभेतील शेतकरी व नागरिकांच्या हितांच्या मागण्यांचे निवेदन राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांना काँग्रेसच्या वतीने करण्यात आले.



