(भीम आर्मी व आजाद समाज पार्टी (कां.) यांचे मुख्यमंत्रीांकडे निवेदन संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करून निलंबित करण्याची मागणी)
✒️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
यवतमाळ : दिनांक ६ डिसेंबर २०२५ रोजी यवतमाळ जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागामार्फत इयत्ता ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेदरम्यान इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांना “उच्च जातिचे नाव काय?” असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे दिलेले पर्याय — ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वैश्य — हे जातीय भेदभाव वाढवणारे, संविधानविरोधी आणि अत्यंत अनुचित असल्याचा आरोप आजाद समाज पार्टी (कां.) व भीम आर्मीच्या प्रतिनिधींनी केला आहे.

या गंभीर प्रकरणावर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेबांना निवेदन देण्यात आले. शिक्षणाच्या माध्यमातून समानता, बंधुता आणि सामाजिक न्यायाची भावना जोपासली जाणे अपेक्षित असताना अशा प्रकारचा प्रश्न विद्यार्थ्यांवर चुकीचा परिणाम करणारा असून समाजात जातीय दरी निर्माण करणारा आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

सदर प्रश्न प्रश्नपत्रिकेत कोणाच्या जबाबदारीतून समाविष्ट झाला, याची तात्काळ चौकशी करण्यात यावी तसेच प्रश्नपत्रिका तयार व मंजूर करणाऱ्या यवतमाळ जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाही करून त्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली.तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रश्नपत्रिका तयार करण्याची आणि अंतिम मंजुरीची प्रक्रिया अधिक काटकसरी, पारदर्शक व जबाबदारीची करण्याचे निर्देश देण्याची विनंती करण्यात आली आहे.

यावेळी अशोक भालेराव, जिल्हाध्यक्ष, भीम आर्मी यवतमाळ, राजकुमार भगत युवा जिल्हाध्यक्ष, आजाद समाज पार्टी (कां.), राहुल धुळे, वैभव सूर्यवंशी, अश्विन कांबळेआदी पदाधिकारी उपस्थित होते. सदर प्रकरणामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये निर्माण झालेली चिंता लक्षात घेऊन तातडीने सकारात्मक कारवाई करण्याची अपेक्षा निवेदनकर्त्यांनी व्यक्त केली.







