✍️सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466
पुसद – मध्यप्रदेशातील ग्वालियर येथे संविधान निर्माते, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा अपमान करून त्यांचा फोटो जाळण्यात आल्याच्या घटनेचा आजाद समाज पार्टी (कां.) व भीम आर्मी यांच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. या प्रकरणातील दोषींवर राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम (NSA Act) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी राष्ट्रपती महोदयांकडे करण्यात आली आहे.

या संदर्भात आजाद समाज पार्टी (कां.) युवा जिल्हाध्यक्ष यवतमाळ राजकुमार भगत व भीम आर्मी यवतमाळ जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव यांच्या वतीने राष्ट्रपती महोदयांना उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार असून कोट्यवधी वंचित, शोषित व बहुजन समाजाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या प्रतिमेचा अपमान करणे म्हणजे भारतीय संविधान, लोकशाही व समतेच्या मूल्यांवर थेट हल्ला असून, या घटनेमुळे संपूर्ण देशातील आंबेडकरवादी समाजाच्या भावना तीव्रपणे दुखावल्या आहेत. तसेच समाजात तेढ व अशांतता निर्माण होण्याची गंभीर शक्यता आहे.या घटनेत सहभागी असलेल्या सर्व आरोपींवर NSA Act अंतर्गत तत्काळ, कठोर व उदाहरणार्थ कारवाई करावी. सामान्य कायद्यांतर्गत कारवाई अपुरी असून, समाजविघातक प्रवृत्तीला वेळीच चाप लावणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तसेच मागण्यांची तात्काळ पूर्तता न झाल्यास आजाद समाज पार्टी (कां.) व भीम आर्मीच्या वतीने महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यभर तसेच देशभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा कडक इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीस संपूर्णपणे संबंधित प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

यावेळी भीम आर्मी जिल्हाध्यक्ष यवतमाळ अशोक भालेराव, आजाद समाज पार्टी कां. युवा जिल्हाध्यक्ष यवतमाळ राजकुमार भगत, भीम आर्मी पुसद तालुका उपाध्यक्ष वैभव सूर्यवंशी, राहुल धुळे, शांतीशील जाधव उपस्थित होते.



