“मद्यधुंद अवस्थेत ‘गोळ्या घालीन’ची धमकी ?; अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466
उमरखेड :- गौळ खुर्द (ता. पुसद) येथील सुरेश दादाराव हराळ यांनी उमरखेड येथील नायब तहसिलदार विश्वांभर राणे व अन्य दोघांविरुद्ध गंभीर तक्रार दाखल केली आहे. मद्यधुंद अवस्थेत बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणात पोफाळी पोलिसांनी आरोपींची पाठराखण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.तक्रारदार हराळ यांच्या म्हणण्यानुसार, दि. 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे 9 वाजता ते मुलगा पार्थ हराळ याच्यासह शिळोणा येथून परत येत असताना गौळ रोडवर एमएच-29/सीजे-2282 क्रमांकाची गाडी आडवी उभी असल्याचे दिसले. अपघात झाल्याचा समज करून त्यांनी वाहन थांबविले.

त्यावेळी संबंधित नायब तहसिलदार व दोन खाजगी व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत बाहेर आले. राणे यांनी बंदूक काढून मानेवर लावत “गोळ्या घालीन” अशी धमकी दिली व त्यानंतर प्लास्टिक दांड्याने मारहाण केल्याचा आरोप आहे. घटनेची माहिती हराळ यांनी 112 क्रमांकावर दिली. दरम्यान, मोबाईलवर व्हिडिओ चित्रीकरण करत असताना त्यांना मज्जाव करून पुन्हा झटापट करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. संबंधित व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची चर्चा आहे.


घटनास्थळी पोफाळी पोलिसांनी सर्वांना ठाण्यात नेले. मात्र तक्रार नोंदवून घेण्याऐवजी “शासकीय कामात अडथळा” आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप हराळ यांनी केला आहे.वैद्यकीय तपासणीची मागणी करूनही ती करण्यात आली नाही, तसेच त्यांना व त्यांच्या मुलाला रात्री उशिरापर्यंत ठाण्यात थांबवून ठेवण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. संबंधित नायब तहसिलदार व इतरांना मात्र सोडून देण्यात आल्याचा आरोप आहे.


या प्रकरणी हराळ यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, मानवाधिकार आयोग तसेच मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांच्याकडे लेखी तक्रार सादर करून संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची व कठोर कारवाईची मागणी केली आहे.





