✍️सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466

उमरखेड : तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या पत्रकारावरच गंभीर गुन्हे दाखल करण्यात आल्याने उमरखेड येथे संतापाची लाट उसळली आहे.धाडस 007 या युट्यूब न्यूज चॅनलचे संपादक पत्रकार अमित वसंतराव देशमुख यांनी दि. 10 मार्च 2026 रोजी यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे उमरखेड तालुक्यात सुरू असलेल्या अवैध दारू विक्री, जुगार, गांजा, गुटखा, मटका व अवैध वाहतूक यासारख्या धंद्यांविरोधात तक्रार केली होती. तसेच त्यांनी यापूर्वीही आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून या अवैध प्रकारांविरोधात वारंवार बातम्या प्रसारित केल्या होत्या.

यानंतर दि. 12 मार्च 2026 रोजी रात्री उमरखेड पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी बोलावण्यात आले असता, पत्रकार म्हणून माहिती जाणून घेत असताना ठाणेदार शंकर पांचाळ यांनी वैयक्तिक आकसातून त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा व जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न यांसारखे गंभीर गुन्हे दाखल केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे हे गुन्हे मध्यरात्री उशिरा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि समाजहिताच्या भावनेतून पत्रकारिता करणाऱ्या सुशिक्षित युवकावर करण्यात आलेली ही कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप होत आहे. या घटनेमुळे भविष्यात अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या पत्रकारांवरही खोटे गुन्हे दाखल होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.याबाबत चितांगराव कदम (सहसंपर्क प्रमुख, यवतमाळ जिल्हा) यांनी राज्याचे गृहमंत्री तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निवेदन देत ठाणेदार शंकर पांचाळ यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांचे तात्काळ स्थानांतरण करण्याची मागणी केली आहे.

तसेच पत्रकार अमित देशमुख यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेऊन त्यांना न्याय देण्याची मागणीही करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी प्रवीण पाटील शिवसेना मिराशे तालुकाप्रमुख, संतोष जाधव विधानसभा संघटक, दत्ता दिगंबर वानखेडे विधानसभा समन्वयक, कपिल चव्हाण तालुका संघटक, रविकांत रुडे तालुका समन्वयक, विधीतज्ञ संजय जाधव शिवसेना शहर प्रमुख, ढाणकी शहर प्रमुख संजय सलेवाड, प्राचार्य विना कदम सर, माजी उपजिल्हाप्रमुख कैलास कदम सुनील शहाणे शेख इरफान शेख हिचा रमेश चव्हाण, शिवसेना महिला शहराध्यक्ष सपना ताई चौधरी, मीना सुलभेवार व पदाधिकारी व अन्य सर्व शिवसैनिक उपस्थित होते.






