🛑 [फक्त किरकोळ विक्रेतेच नाही तर उत्पादक, वितरक आणि वाहतूकदारांची संपूर्ण साखळी उद्ध्वस्त करणार] 🛑

✍️सिध्दार्थ दिवेकर प्रतिनिधी ( कार्यकारी संपादक) मो.9823995466
मुंबई: – राज्यातील गुटखा, तंबाखू व निकोटीनयुक्त पानमसाला यांसारख्या प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या अवैध व्यापाराविरुद्ध कठोर कारवाई करताना संबंधित गंभीर प्रकरणांमध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) १९९९ लागू करण्याचे स्पष्ट निर्देश अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर आधीच बंदी असतानाही काही ठिकाणी संघटित स्वरूपात अवैध व्यापार सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.

या पार्श्वभूमीवर केवळ किरकोळ विक्रेत्यांवर नव्हे, तर संपूर्ण पुरवठा साखळीवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.FDA च्या माहितीनुसार, अनेक प्रकरणांमध्ये उत्पादक, वितरक, वाहतूकदार, गोदाम चालक, घाऊक विक्रेते आणि किरकोळ विक्रेते यांचा परस्पर संबंध असलेले जाळे कार्यरत असते. बनावट कागदपत्रे, बेनामी व्यवहार, गुप्त गोदामे आणि आंतरराज्य पुरवठा साखळीच्या माध्यमातून हा व्यापार चालविला जात असल्याचे आढळले आहे.

मकोका कायद्यातील तरतुदीनुसार एखादा गुन्हा तीन वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षापात्र असेल, मागील दहा वर्षांत एकापेक्षा अधिक आरोपपत्रे दाखल झाली असतील आणि गुन्हे आर्थिक लाभासाठी संघटित पद्धतीने करण्यात आले असतील, तर अशा प्रकरणांमध्ये मकोका लागू करण्याची पात्रता तपासली जाणार आहे.

अशी होणार कारवाई प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या गुन्ह्यांमध्ये मकोका लागू करण्याची प्रक्रिया सुरू.केवळ विक्रेत्यांवर नव्हे तर संपूर्ण नेटवर्कवर कारवाई.उत्पादक, पुरवठादार, वाहतूकदार, गोदाम चालक आणि वितरकांची चौकशी.पोलिस आणि FDA यांच्यात समन्वय साधून संयुक्त कारवाई.प्रत्येक जिल्ह्यात मकोका पात्र प्रकरणांची स्वतंत्र नोंदवही.राज्यस्तरावर प्रकरणांचे नियमित परीक्षण व देखरेख.जामिनासाठी जाचक अटीमकोका लागू असलेल्या प्रकरणांमध्ये जामीन मिळविण्यासाठी कठोर अटींची पूर्तता करावी लागणार असून सरकारी अभियोक्ता, पोलिस आणि FDA यांच्यातील समन्वयाद्वारे न्यायालयात प्रभावी बाजू मांडण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

FDA ने नागरिकांना आवाहन केले आहे की, गुटखा, तंबाखू किंवा निकोटीनयुक्त पानमसाला तसेच इतर प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण किंवा विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ स्थानिक अन्न व औषध प्रशासन कार्यालय अथवा पोलिसांना कळवावे.






