✍️सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466

उमरखेड तालुक्यातील विडूळ येथे ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नवी आबादी येथे महिलांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला गावातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यात आला.

यावेळी महसूल विभागातील मान्यवर अधिकारी उपविभागीय अधिकारी मुळे सर, तहसिलदार राजेंद्रजी सुरटकर सर व पुरवठा निरीक्षक अमोल महाजन सर यांनी सामाजिक भावनेतून उपस्थित राहून महिलांच्या विविध अडचणी समजून घेत त्यांना मार्गदर्शन केले. या बैठकीमध्ये विशेषतः रेशन कार्ड संदर्भातील अनेक नागरिकांच्या समस्या मांडण्यात आल्या. काही अत्यंत गरजू कुटुंबांकडे रेशन कार्ड नसल्याचेही समोर आले. उपस्थित अधिकाऱ्यांनी त्या समस्या ऐकून मार्गदर्शन केले तसेच अनेकांच्या अडचणी सोडविण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या.

रविवार हा शासकीय सुट्टीचा दिवस असतानाही समाजसेवेच्या भावनेतून अधिकाऱ्यांनी नागरिकांसाठी वेळ काढून सहकार्य केले. त्यांच्या या संवेदनशील कार्याबद्दल उपस्थित नागरिकांनी मनापासून आभार व्यक्त केले. हा उपक्रम सामाजिक कार्यकर्त्या धनश्री अनंता बिचेवार यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता. समाजातील गरजू, आदिवासी व मागासवर्गीय कुटुंबांना शासकीय योजनांची माहिती मिळावी आणि त्यांच्या समस्या मार्गी लागाव्यात हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

विडूळ येथे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना उपविभागीय अधिकारी मुळे, तहसिलदार राजेंद्रजी सुरटकर, मा. पुरवठा निरीक्षक श अमोल महाजन तसेच सामाजिक कार्यकर्त्या धनश्री अनंता बिचेवार व उपस्थित नागरिक.





