
✍🏻 करण भरणे सर (ढाणकी बिटरगाव प्रतिनिधी)
ढाणकी:-रा.प. कामगारांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि . 15 जून रोजी एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने उमरखेड बस स्थानक गेटसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.

दि.१३ ऑक्टोबर २०२५ रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सोबत एसटी कामगार संघटनेच्या झालेल्या बैठकीत मान्य केल्यानुसार खालील प्रलंबित रा.प. महामंडळातील कर्मचा-यांना राज्य शासकीय कर्मचा-यांप्रमाणे वेतन लागू करण्यात यावे , सन २०१६-२०२० या कालावधीच्या कामगार करारासाठी रु.४८४९ कोटीचे पॅकेज एकतर्फी जाहिर करताना यापुर्वीच्या कामगार करारान्वये देय असलेल्या वार्षिक वेतनवाढीचा दर ३ टक्क्याऐवजी २ टक्के व घरभाडे भत्ता ८,१६ व २४ टक्क्याऐवजी ७,१४ व २१ टक्के असा कमी केलेला होता. सदरचा कमी केलेला दर माहे नोव्हेंबर २०२१ पासून वार्षिक वेतनवाढीचा दर ३टक्के व घरभाडे भत्त्याचा दर ८,१६ व २४टक्के लागू करण्यात आला.

परंतु माहे एप्रिल २०१६ ते माहे ऑक्टोबर २०२१ पर्यंतची कमी केलेल्या दरांची थकबाकी प्रलंबित आहे ती देण्यात यावी ,सन २०१८ पासूनची महागाई भत्याची थकबाकी रा.प. कामगारांना ३ महिन्यात अदा करण्याबाबत औद्योगिक न्यायालय, मुंबई यांनी माहे जानेवारी २०२४ मध्ये आदेश देऊनही सदरची थकबाकी अद्याप दिलेली नाही ती देण्यात यावी, कामगार कराराच्या तरतुदीनुसार राज्य शासकीय कर्मचा-यांप्रमाणे देय असलेला ५८ टक्के महागाई भत्ता मागील थकबाकीसह देण्यात यावा, दि.५.२.२०१९ च्या शासन निर्णयानुसार माहे जुलै, २०२१ पासून ९,१८ व २७ टक्के व माहे जुलै, २०२४ पासून १०, २० व ३० टक्के घरभाडे भत्ता रा.प. कामगारांना थकबाकीसह लागू करण्यात यावा, इतर राज्यांप्रमाणे एस. टी. महामंडळासाठी राज्याच्या अर्थ संकल्पात तरतुद करण्यात यावी.

रा.प. महामंडळातील मध्यवर्ती कार्यशाळेमध्येच नवीन बस बांधणी करण्यासाठी चॅसिसचा पुरवठा करण्यात यावा व स्वमालकीच्या बस बांधण्यात याव्यात. सन २०१७ पासूनज्या प्रवर्गांना वर्ग दोन कनिष्ठ चा दर्जा देण्यात आला आहे त्या सर्व प्रवर्गांना वर्ग दोन कनिष्ठ प्रमाणे वेतनश्रेणी लागू करण्यात यावी .एसटी महामंडळामध्ये कंत्राटी कामगारांची भरती करण्यात येऊ नये अशा विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने उमरखेड एसटी आगारात घंटानाद आंदोलन करण्यात आले.

यामध्ये एसटी कामगार संघटनेचे आगार अध्यक्ष विकास सूर्यवंशी ,सचिव सुरेशभाऊ मोरे ,कोषाध्यक्ष संजय कदम , कार्याध्यक्ष गजानन नंदनवार ,आदि पदाधिकाऱ्यांसह वरिष्ठ लिपिक कांगणे नावे तसेच मोठ्या संख्येने एसटी कामगार आंदोलनात सहभागी झाले होते .






