🚨(प्रत्येक वार्ड ३ ते ४ दिवस पेंडिंग; शहरात घाणीचे साम्राज्य, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू!)

उमरखेड – शहरातील नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक १ ते १३ मध्ये सध्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे प्रत्येक प्रभागातील नाल्यांची साफसफाई तब्बल ३ ते ४ दिवसांआड होत असल्याने संपूर्ण शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

सध्या नगरपरिषदेकडून ‘स्वच्छता मोहीम’ सुरू असल्याचा कांगावा केला जात आहे. मात्र, या मोहिमेच्या नावाखाली प्रत्येक वार्ड ३ ते ४ दिवस साफसफाईविना पेंडिंग ठेवला जात आहे. जर मोहीम खरोखरच सुरू आहे, तर मग वॉर्डांमध्ये कचरा आणि घाण का साचत आहे? असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे. यावरून उमरखेड नगरपरिषदेची ही तथाकथित स्वच्छता मोहीम पूर्णपणे अपयशी ठरल्याचे स्पष्ट होत आहे.

नाल्यांची दुरवस्था आणि पावसाळ्यापूर्वीची भीती
शहरातील काही प्रभागांमध्ये नाल्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून त्यांची रुंदी खूप कमी आहे. परिणामी, एकाच दिवसात या नाल्या घाणीने तुडुंब भरून वाहत आहेत. पावसाळा तोंडावर आला असतानाही नगरपरिषदेला याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. मुख्याधिकारी, नगराध्यक्ष आणि आरोग्य सभापती यांनी एसी केबिनमधून बाहेर पडून नागरिकांच्या आरोग्याची दखल घ्यावी आणि दैनंदिन साफसफाई सुरू करावी, अशी तीव्र मागणी उमरखेडवासी करत आहेत.

🚨नागरिकांना सुविधा ‘शून्य’, मात्र कर वसुलीत आघाडी!
”नगरपरिषद प्रशासनाकडून नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि हितासाठी ०% (शून्य टक्के) सुविधा दिल्या जात आहेत. मात्र, दुसरीकडे करपट्टीमध्ये ‘उपयोगिता कर’ (युझर चार्जेस) सर्वात जास्त वसूल केला जात आहे. हा जनतेवर थेट अन्याय आहे! पावसाळा पूर्णपणे सक्रिय होण्यापूर्वी प्रशासनाने सर्व प्रभागांतील नाल्यांची दुरुस्ती करून सांडपाणी वाहून जाण्याचा मार्ग मोकळा करावा. तसेच प्रत्येक वॉर्डात दैनंदिन साफसफाईसाठी पुरेसे कर्मचारी नेमून नियमित स्वच्छता करावी, अन्यथा भीम टायगर सेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल!”
— सिद्धार्थ दिवेकर
(सामाजिक कार्यकर्ते तथा शहराध्यक्ष, भीम टायगर सेना, उमरखेड)







