✍️सिद्धार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक ) मो.9823995466

ढाणकी (दिनांक 21 जून) अल्पवयीन बहिणीचा पाठलाग करून तिची बदनामी केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या भावावर कोयता, चाकू आणि दगडाने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना ढाणकी शहरातील मच्छी मार्केट जवळ घडली. या जीवघेण्या हल्ल्यात भाऊ गंभीर जखमी झाला असून, सुज्ञ नागरिक आणि पोलिसांच्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. याप्रकरणी बिटरगाव पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध ‘पोक्सो’सह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आई यांनी १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गावातीलच मयूर गोकुळ शिवाल (वय २०) हा सतत त्रास देत होता.

ती शाळेत जात असताना पाठलाग करून बदनामी करत असल्याने, कुटुंबीयांनी तिचे शिक्षण १० वी नंतर बंद करून तिला पुण्यात मावशीकडे पाठवले. मात्र, मयूरने तिथेही जाऊन तिचा छळ सुरूच ठेवला. याचा जाब विचारणाऱ्या पीडितेचा भाऊ शुभम याला मयूरने “तुझ्याने काय होते ते करून घे” अशी धमकी दिली होती.१९ जून २०२६ रोजी सकाळी मयूर आणि त्याच्या काकाने शुभमला फोनवर शिवीगाळ केली. यामुळे शुभम मयूरच्या घरासमोर जाब विचारण्यास गेला असता वाद पेटला. मयूरचा काका गोपाल शिवाल याने मयूरच्या हातातील मोठा कोयता हिसकावून तक्रारदाराच मुलावर वार केला. त्यानंतर मयूरने घरातून दुसरा लहान कोयता व चाकू आणून शुभमवर पुन्हा सपासप वार केले. याच वेळी पवन शिवाल (वय १६) याने रस्त्यावरील दगड शुभमच्या डोक्यात मारला.


या हल्ल्यात शुभमच्या डोक्याला, हाताला, नाकावर आणि पाठीवर गंभीर जखमा झाल्या.मच्छी मार्केटजवळ मोठ्या प्रमाणावर भांडण सुरू असल्याची माहिती मिळताच ठाणेदार पांडुरंग शिंदे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक सागर अन्नमावर, जमादार मोहन चाटे, शरद चव्हाण, राहुल कोकरे आणि सुदर्शन जाधव यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. गर्दीत मध्यस्थी करून भांडण सोडवताना पोलीस शिपाई सुदर्शन जाधव यांनाही मार लागला.

पोलिसांची गाडी वेळेत पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला आणि जखमी शुभमला तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून मयूर शिवाल यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ आणि पोक्सो (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बिटरगाव पोलीस ठाणेदार पांडुरंग शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर अन्नमवार करत आहे. दरम्यान, शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी ढाणकी शहरात पोलिसांनी तात्काळ ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबवावे, अशी मागणी सुज्ञ नागरिकांमधून केली जात आहे.







